दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली   

पुणे : कात्रज येथील लाटमे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला आंबेगाव पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून पोलिसांनी कोयता, मिरची पुड, दोरी, दुचाकी, असा ४० हजार रुपयांचा माल जप्त केला. 
  
याबाबत पोलिस अंमलदार हनुमंत मासाळ यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सौरभ गोरक्ष चौधरी (वय- २३ रा. जय शंकर कॉलनी, अंजनी नगर, कात्रज), ओंकार महादेव देवकाते  (वय-२२, रा. गल्ली क्रमांक ७, संतोष नगर, कात्रज) आणि रघुनाथ प्रकाश मटकट्टे (वय-१८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. आंबेगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रतिकांत कोळी व पोलिस अंमलदार भोसले, कातुर्डे, हनुमंत मासाळ हे २४ एप्रिल रोजी रात्री पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना आरोपी पुणे-सातारा रस्त्यावरील गंधर्व लॉन्सच्या मोकळ्या मैदानात अंधारामध्ये ५ ते ६ जण घातक हत्यारासह थांबले असल्याची माहिती मिळाली. 
 
त्याआधारे पोलिसांनी घटनास्थळी टोळीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील तिघांनाच पकडण्यात पोलिसांना यश आले. तर तीनजण अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक कोयता, दुचाकी, मिरची पुड, आणि दोरी असा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत पैशांची आवश्यकता असल्यामुळे कात्रज येथील लाटमे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी एकत्रित जमले होतो, अशी माहिती आरोपींनी दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रविकांत कोळी करीत आहेत.

Related Articles